loader
Breaking News
Breaking News
Foto

ओमकार हत्तीसोबत खेळणे थांबवा; ठोस निर्णय घ्या, उपसभापती गणेशप्रसाद गवस यांचा वनविभागाला इशारा

साटेली भेडशी, (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या रानटी हत्तींच्या उपद्रवाचा प्रश्न अद्याप कायम असून, या समस्येवर वनविभागाकडून ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याची नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. त्यातच ‘ओमकार’ नावाचा हत्ती मुख्य कळपापासून दूर राहून गावागावांत फिरत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर दोडामार्ग पंचायत समितीचे उपसभापती गणेशप्रसाद गवस यांनी वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ओमकार हत्तीसोबत खेळणे थांबवा आणि नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ठोस निर्णय घ्या, अशी मागणी त्यांनी केली. वनविभागाकडून हत्तीच्या बाबतीत करण्यात येणारे विविध प्रयोग शेतकर्‍यांच्या मुळावर येत असल्याचा आरोप करत गवस म्हणाले, हा मांजराचा खेळ सुरू आहे; मात्र उंदराचा जीव जात आहे. त्यामुळे प्रयोग आणि तात्पुरत्या उपाययोजनांपेक्षा नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेला प्राधान्य देत कायमस्वरूपी निर्णय घेण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रानटी हत्तींचा नैसर्गिक अधिवास जंगल परिसर असताना ओमकार हत्ती सातत्याने मानवी वस्त्यांच्या आसपास फिरत असल्याचे दिसून येत आहे. गावांमध्ये, शेतीच्या परिसरात तसेच मानवी वर्दळ असलेल्या ठिकाणी त्याचा वावर वाढणे ही गंभीर बाब असल्याचे गवस यांनी म्हटले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गाव हा हत्तीचा नैसर्गिक अधिवास नाही. त्यामुळे ओमकारचे गावागावांत फिरणे योग्य नाही. आज तो शांत दिसत असला तरी तो वन्यप्राणी आहे. भविष्यात परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी वनविभागाने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे, असे गवस यांनी सांगितले. ओमकार हत्ती मुख्य कळपापासून दूर असल्याचे सांगितले जात आहे. इतर हत्ती त्याला कळपात स्वीकारत नसतील, तर त्याच्या वर्तनात बदल होण्याची शक्यता लक्षात घेऊन वनविभागाने अधिक दक्षता घेणे आवश्यक असल्याचे गवस यांनी म्हटले आहे. वन्य हत्तींच्या वर्तनाचा अभ्यास करून त्याच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवणे, त्याचा अधिवास निश्चित करणे आणि मानवी वस्त्यांपासून त्याला सुरक्षित अंतरावर ठेवण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. ओमकार हत्तीला पकडण्यास विरोध करणार्‍यांवरही गवस यांनी निशाणा साधला. ओमकारला पकडू नये, त्याला मोकळे सोडावे असे म्हणणार्‍यांनी पुढे येऊन नागरिकांच्या नुकसानीची जबाबदारी स्वीकारावी. वन्यप्राण्यांबाबत भावनिक भूमिका घेणे वेगळे आणि नागरिकांच्या जीविताची जबाबदारी घेणे वेगळे आहे, असे ते म्हणाले.

टाईम्स स्पेशल

हत्तीमुळे एखाद्या नागरिकाच्या घराचे, शेतीचे किंवा अन्य मालमत्तेचे नुकसान झाले अथवा भविष्यात गंभीर दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दोडामार्ग तालुक्यात रानटी हत्तींचा उपद्रव अनेक वर्षांपासून सुरू आहे. हत्तींकडून शेतीचे नुकसान होणे, घरांच्या परिसरात त्यांचा वावर वाढणे आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणे, या समस्या वारंवार समोर येत आहेत. मात्र, केवळ हत्ती गावात आल्यानंतर त्याला हुसकावून लावणे किंवा काही काळ त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, एवढ्यावर हा प्रश्न सुटणार नाही. हत्तींच्या हालचालींचे शास्त्रीय व्यवस्थापन, संवेदनशील गावांमध्ये पूर्वसूचना यंत्रणा, प्रभावी गस्त आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी कृती आराखडा आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. ओमकार हत्तीच्या बाबतीत वनविभागाने केवळ परिस्थितीवर लक्ष ठेवत राहण्याऐवजी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी गवस यांनी केली आहे. हत्तीला पकडणे, त्याचे स्थलांतर करणे किंवा त्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात नेणे यापैकी कोणता पर्याय योग्य आहे, याचा तातडीने निर्णय घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ओमकारच्या जीवाला धोका निर्माण करणे हा उद्देश नाही; मात्र नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ नये. वन्यजीवांचे संरक्षण आणि नागरिकांची सुरक्षा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे वनविभागाने आता ठोस भूमिका घेतली पाहिजे, असे गणेशप्रसाद गवस यांनी स्पष्ट केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg