loader
Breaking News
Breaking News
Foto

नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे पुरस्कार जाहीर; सामाजिक कार्यकर्ते संजू परब यांना ‘आदर्श समाजभूषण’!

सावंतवाडी(प्रतिनिधी)- माजी नगराध्यक्ष, नगरसेवक संजू परब यांना नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेने आदर्श समाजभूषण पुरस्कार जाहीर केला आहे. नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी दिले जाणारे जिल्हास्तरीय पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष आत्माराम राऊळ यांनी जाहीर केले आहेत. यामध्ये आदर्श समाजभूषण पुरस्कार, उपक्रमशील आदर्श शिक्षक व आदर्श शिक्षिका पुरस्कारांचा समावेश आहे. संस्थेचे माजी अध्यक्ष कै. श्रीपाद गोविंद तथा तात्यासाहेब पोकळे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘आदर्श समाजभूषण पुरस्कार’ सामाजिक कार्यकर्ते सच्चिदानंद उर्फ संजू जगन्नाथ परब यांना जाहीर झाला आहे. मडुरा, सावंतवाडी परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आरोग्य व कौटुंबिक अडचणींच्या वेळी वैयक्तिक मदत करणे, तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच दशावतारी कलाकार आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार घोषित करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नेमळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक कै. जयसिंगराव भालजी पेंढारकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘उपक्रमशील आदर्श शिक्षक पुरस्कार’ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इन्सुली नं. ७ (ता. सावंतवाडी) येथील शिक्षक महेश लाडू सावंत यांना जाहीर झाला आहे. शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, विज्ञान प्रदर्शन, साहित्य निर्मिती आणि शासनाच्या नवोपक्रम स्पर्धेतील यशाबद्दल, तसेच बालभारती पुणे येथील इंग्रजी विषय समिती सदस्य म्हणून त्यांनी केलेल्या कामगिरीची दखल घेत हा पुरस्कार देण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

सहकार महर्षी कै. शिवराम भाऊ जाधव आणि त्यांच्या पत्नी कै. प्रमिला जाधव यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ’उपक्रमशील आदर्श शिक्षिका पुरस्कार’ एस. एल. देसाई विद्यालय (पाट, ता. कुडाळ) येथील शिक्षिका सौ. अंकिता विलास मोडक यांना जाहीर झाला आहे. उत्कर्षा उपक्रम, साक्षरता, दिव्यांग विद्यार्थ्यांना इंग्रजी मार्गदर्शन, वारली पेंटिंग, काव्यलेखन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक राम खुबा राठोड व शिक्षक वर्गाने आलेल्या प्रस्तावांचे परीक्षण करून ही निवड केली आहे. कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख अनिल लक्ष्मण कांबळे करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg