loader
Breaking News
Breaking News
Foto

आता जगभरात पोहोचणार गोव्याची चवथ ‘आमची चवथ’ ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन

पणजी, : गोव्याच्या गणेश चतुर्थी अर्थात ‘चवथ’चा पारंपरिक उत्साह, भक्ती, सर्जनशीलता आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा आता जगभर पोहोचणार आहे. गोवा सरकारच्या कला व संस्कृती खात्यातर्फे राज्यव्यापी ‘आमची चवथ २०२६’ ऑनलाइन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांच्या माध्यमातून गोव्याच्या वैशिष्ट्यपूर्ण ‘चवथ’ची सांस्कृतिक ओळख देश-विदेशातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. ‘आमची चवथ २०२६’ स्पर्धेमध्ये खालील पाच विभागांचा समावेश करण्यात आला आहे : माटोळी सजावट, सार्वजनिक गणेशोत्सव देखावा, कौटुंबिक परंपरा व्हिडिओ/रील, गणपती गीत गायन, गणपती स्तोत्र पठण. या स्पर्धेसाठी ११ सप्टेंबर २०२६ पासून ऑनलाइन नोंदणीला सुरुवात होणार आहे. माटोळी सजावट आणि सार्वजनिक गणेशोत्सव देखावा या दोन विभागांसाठी १५ सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका स्वीकारण्यात येणार असून, कला व संस्कृती खात्याने नियुक्त केलेल्या परीक्षकांमार्फत त्यांचे परीक्षण करण्यात येईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

उर्वरित तीन विभागांसाठी म्हणजेच कौटुंबिक परंपरा व्हिडिओ/रील, गणपती गीत गायन आणि गणपती स्तोत्र पठण यांसाठी २० सप्टेंबरपर्यंत प्रवेशिका स्वीकारल्या जातील. या प्रवेशिकांचे परीक्षण खात्याच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवर प्रकाशित झालेल्या व्हिडिओंना मिळणार्‍या व्ह्यूज, लाईक्स आणि शेअर्सच्या आधारे ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. व्ह्यूज, लाईक्स किंवा शेअर्स कृत्रिम, फसव्या अथवा अन्यायकारक पद्धतीने वाढविण्याचा प्रयत्न करणार्‍या स्पर्धकांना अपात्र ठरविण्यात येणार असल्याचे खात्याने स्पष्ट केले आहे. स्पर्धक अधिकृत क्यूआर कोडद्वारे नोंदणी करून प्रवेशिका सादर करू शकतात. प्रत्येक विभागातील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. गोव्याच्या गणेश चतुर्थीशी निगडित असलेल्या विविध परंपरा, कुटुंबांची श्रद्धा, कलात्मकता आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे वैविध्य या माध्यमातून जगासमोर आणण्याची संधी या स्पर्धेमुळे उपलब्ध होणार आहे. व्यक्ती, कुटुंबे आणि गणेशोत्सव मंडळांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गोव्याच्या ‘चवथ’चा अनोखा सांस्कृतिक वारसा जगापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन कला व संस्कृती खात्याने केले आहे.

टाईम्स स्पेशल

स्पर्धेचे नियम, विविध विभाग, नोंदणी प्रक्रिया आणि प्रवेशिका सादर करण्याबाबतची सविस्तर माहिती कला व संस्कृती खात्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम आणि फेसबुक पेजवर उपलब्ध करण्यात येणार आहे. अधिक माहिती व मदतीसाठी नागरिकांनी ७०६६५११६११ हा क्रमांक आपल्या मोबाईलमध्ये ‘आमची चवथ’ या नावाने सेव्ह करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘आमची चवथ २०२६’च्या माध्यमातून गोव्याची संस्कृती, परंपरा आणि गणेशोत्सवाचा उत्साह जगभर पोहोचविण्यासाठी गोमंतकीयांनी उत्स्फुर्तपणे सहभागी व्हावे, असे कला व संस्कृती संचालक विवेक कृष्णा नाईक यांनी आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg