loader
Breaking News
Breaking News
Foto

बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - बुरंबी पंचक्रोशी शिक्षण संस्था कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षक दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण, आनंददायी व भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ‘शिक्षक बनून शिक्षकांना अनुभवणे आणि त्यांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे’ या संकल्पनेतून विद्यार्थ्यांनी विविध अभिनव उपक्रमांचे आयोजन केले. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य विरकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या स्टाफ रूमच्या उद्घाटनाने झाली. प्राचार्य विरकर, उपप्राचार्य साठे व सर्व शिक्षकांच्या हस्ते शिक्षकाची भूमिका साकारणाऱ्या विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका स्वीकारून अकरावीच्या वर्गांवर पहिल्या चार तासिका घेतल्या. विद्यार्थ्यांनी उत्साहाने व जबाबदारीने अध्यापन केले. या अनुभवातून शिक्षक होणे किती जबाबदारीचे व आव्हानात्मक कार्य आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यानंतर सर्व शिक्षकांच्या हाताने स्पर्श झालेली माती एकत्र करून सोनचाफ्याच्या रोपट्याची लागवड करण्यात आली. शिक्षकांचे संस्कार विद्यार्थ्यांच्या जीवनात रुजून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास घडवतात, या भावनेतून हा उपक्रम घेण्यात आला. त्यानंतर शिक्षकांचे सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले. सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सुरेल स्वागतगीताने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे औक्षण करून विद्यार्थ्यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. बारावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या कार्यावर आधारित ‘शिक्षक डायरी’ तयार केली. शिक्षकांनी दिलेले ज्ञान, संस्कार, मार्गदर्शन व विद्यार्थ्यांच्या जीवनातील त्यांचे योगदान या डायरीत शब्दबद्ध करण्यात आले. या डायरीचे उद्घाटन प्राचार्य श्री. विरकर यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांना प्रेमपूर्वक भेटवस्तू दिल्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या ‘कवितांचा खलिता’, स्वतः तयार केलेला पुष्पगुच्छ व चॉकलेट यांचा समावेश होता. या भेटवस्तूंमधून विद्यार्थ्यांचा आदर, प्रेम व कृतज्ञता व्यक्त झाली.

टाईम्स स्पेशल

यानंतर शिक्षकांसाठी संगीत खुर्ची, बकेटमध्ये बॉल टाकणे व गाणी ओळखणे यांसारख्या मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले. शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विद्यार्थ्यांसोबत मनमुराद आनंद लुटला. त्यामुळे शिक्षक-विद्यार्थी नाते अधिक आपुलकीचे व आनंददायी झाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांनी केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले गाणे विशेष आकर्षण ठरले. उपस्थितांनी त्याला उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमास प्राचार्य विरकर, उपप्राचार्य साठे, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे, कल्पकतेचे व शिक्षकांप्रती व्यक्त केलेल्या प्रेमाचे उपस्थितांनी कौतुक केले. शिक्षकाची भूमिका स्वीकारून घेतलेल्या तासिका, शिक्षक डायरीची निर्मिती, सोनचाफ्याची लागवड, शिक्षकांचे औक्षण, ‘कवितांचा खलिता’, स्वागतगीत व मनोरंजनात्मक खेळ या उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या मनातील शिक्षकांप्रती असणारा आदर, प्रेम व कृतज्ञता प्रकर्षाने दिसून आली. हा शिक्षक दिन सोहळा गुरू-शिष्य नात्याचा स्नेह जपणारा अविस्मरणीय अनुभव ठरला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg