loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोली येथील गोपाळकृष्ण पतसंस्थेशी संबंधित संशयितांच्यावतीने दाखल अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

दापोली ( वार्ताहर) : दापोली येथील गोपाळकृष्ण पतसंस्थेशी संबंधित संशयितांच्या वतीने खेड येथील जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेला अटकपूर्व जामिनाचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे संशयितांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रकरणात सरकार पक्षाच्या म्हणण्यानुसार, बनावट वेतन प्रमाणपत्रे व अन्य कागदपत्रांच्या आधारे कर्जप्रकरणे मंजूर करून विविध व्यक्तींना कर्जवाटप करण्यात आले. या व्यवहारात चार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम गुंतलेली असल्याचे सरकार पर्क्षातर्फे न्यायालयात सांगण्यात आले. संशयितांच्या वतीने संस्थेने संबंधित कर्जदारांविरोधात वसुलीची कारवाई केली असून काही कर्जदारांविरोधात फौजदारी तक्रारीही दाखल केल्याचा युक्तिवाद करण्यात आला. मात्र, न्यायालयाने या कारवाईमुळे संशयितांची संभाव्य भूमिका नाकारता येणार नसल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाच्या आदेशानुसार, संस्थेला काही कथित अनियमित व्यवहारांची माहिती २०२१ मध्येच असल्याचे लेखापरीक्षण अहवालावरून प्रथमदर्शनी दिसून येते. तरीही तत्काळ प्रभावी कारवाई का झाली नाही, याची चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. संबंधित संशयित हे त्या काळात संस्थेच्या संचालक मंडळावर होते, त्यामुळे कर्जमंजुरी, कर्जवितरण, कागदपत्रांची छाननी आणि कथित गैरप्रकारांची माहिती याबाबत त्यांची स्वतंत्र भूमिका तपासणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले. कोठडीतील चौकशी आवश्यक या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, बनावट कागदपत्रांचा वापर, संचालक मंडळाचे निर्णय, कर्जवितरणाची प्रक्रिया आणि पैशांचा प्रवाह याबाबत तपास यंत्रणेला संशयितांची प्रभावी चौकशी आवश्यक असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. केवळ पुरावे कागदोपत्री आहेत म्हणून कोठडीतील चौकशीची गरज नाही, हा संशयितांचा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला नाही.

टाइम्स स्पेशल

या प्रकरणात पतसंस्थेचे प्रसाद सूर्यकांत मेहता, सुधीर सदानंद तलाठी, राकेश प्रकाश कोटिया, संजय उमेशचंद्र बुटाला, संजय वसंत साबळे, अतुल काळूराम मेहता, शैला प्रभाकर मेहता, सुप्रिया बाळकृष्ण तलाठी, माधवी माधव शेट्ये, रमेश भागोजी गिम्हवणेकर, सुनील पांडुरंग धोपट व व्यवस्थापक भिकू मोरे यांनी अटकपूर्व जामिनासाठी खेड येथील न्यायालयात अर्ज दाखल केला होता. प्रकरणाचे गांभीर्य, मोठ्या रकमेचा कथित आर्थिक गैरव्यवहार, आरोपींची संस्थेतील जबाबदारी आणि तपासासाठी आवश्यक असलेली कोठडीतील चौकशी या बाबी विचारात घेऊन न्यायालयाने अटकपूर्व जामीन देण्यास नकार देत त्यांचा अर्ज फेटाळला आहे. सरकारपक्षातर्फे अँड. मृणाल जाडकर यांनी काम पाहिले. दरम्यान अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यामुळे या १२ संशयितांचा शोध घेण्याचे काम आर्थिक गुन्हे विभागाकडून करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg