loader
Breaking News
Breaking News
Foto

पालकमंत्री उदय सामंत यांच्या आदेशानंतर गणपतीपुळे बीच पुन्हा पर्यटकांसाठी खुला

रत्नागिरी (जमीर खलफे) - रत्नागिरी : जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या गणपतीपुळे येथील समुद्रकिनारा तब्बल ६० दिवस बंद राहिल्यानंतर सुरू करण्यात आला होता. मात्र बीच सुरू होऊन अवघे दहा दिवस होत असतानाच ३ सप्टेंबर रोजी जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून पुन्हा समुद्रकिनारा बंद करण्यात आला. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची भावना निर्माण झाली होती. बीच बंद केल्याने अनेक ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिक आक्रमक झाले. यानंतर सर्वांनी एकत्रित येत रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषद सदस्य राजू साळवी यांच्या माध्यमातून पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शुक्रवारी, ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी रत्नागिरी येथे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भैया सामंत आणि जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी गणपतीपुळे येथील ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांनी पालकमंत्र्यांकडे समुद्रकिनारा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. तसेच समुद्राच्या धोकादायक स्थितीबाबतची वस्तुस्थिती त्यांच्यासमोर मांडण्यात आली. सध्या समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी गणपतीपुळे ग्रामपंचायतीचे सहा जीवरक्षक दोन सत्रांमध्ये कार्यरत असून, त्यांच्या जोडीला जयगड पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेले होमगार्डही कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली. पर्यटकांना समुद्राबाबत योग्य त्या सूचना दिल्या जात असल्याचेही सांगण्यात आले. ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांची बाजू तसेच समुद्रकिनार्‍यावरील सुरक्षेची वस्तुस्थिती जाणून घेतल्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हा प्रशासनाला गणपतीपुळे बीच तात्काळ पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले.

टाईम्स स्पेशल

तसेच याबाबत गणपतीपुळे ग्रामपंचायतीला कळविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार ५ सप्टेंबरपासून गणपतीपुळे समुद्रकिनारा पुन्हा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. बीच सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य राजू साळवी यांच्या समवेत गणपतीपुळे येथील माजी उपसरपंच मयूर केदार, माजी सरपंच महेश ठावरे, कल्पेश सुर्वे, रवी ठावरे, अविनाश माने, उमेश भणसारी, विश्वनाथ पालकर, बंड्या घाणेकर, मंगेश गोताड, किशोर गुरव आदींनी पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन बीच सुरू करण्याची विनंती केली होती. ही विनंती पालकमंत्र्यांनी तात्काळ मान्य केली. यावेळी आमदार किरण (भैया) सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि तालुकाप्रमुख बंड्या साळवी उपस्थित होते. पालकमंत्री उदय सामंत यांनी समुद्रकिनार्‍यावर स्वच्छता राखण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. गणपतीपुळे बीच पुन्हा सुरू केल्याबद्दल ग्रामस्थ आणि पर्यटन व्यावसायिकांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg