loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर तालुक्यात ’खो-खो’चा खेळ संपला! ३२ प्राथमिक शिक्षकांच्या कामगिरी बदल्या अखेर रद्द

संगमेश्वर (सत्यवान विचारे) : संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या कामगिरी बदल्यांवरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादंग आणि राजकीय घडामोडींवर अखेर पडदा पडला आहे. पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सभापती शर्वरी वेल्ये यांनी कडक भूमिका घेत तालुक्यातील तब्बल ३२ प्राथमिक शिक्षकांच्या कामगिरी बदल्या रद्द करण्याचा धडक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार संबंधित शिक्षकांना तत्काळ त्यांच्या मूळ शाळेवर रुजू होण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. सभापतींच्या या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रशासनात सुरू असलेल्या शिक्षकांच्या बदल्यांच्या ’खो-खो’ला पूर्णविराम मिळाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संगमेश्वर तालुक्यात एकूण ४६ प्राथमिक शिक्षकांच्या कामगिरी बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये १४ केंद्रीय बदल्यांचा समावेश होता. मात्र, उर्वरित ३२ बदल्यांवरून प्रचंड वाद निर्माण झाला होता. अंतर, प्रशासकीय अटी व शर्ती आणि नियमांना हरताळ फासून या बदल्या करण्यात आल्याचे आरोप होत होते. या संदर्भात वृत्तपत्रे आणि सोशल मीडियावर सतत उलट-सुलट चर्चा रंगल्याने शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला होता. शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेवरही याचा विपरीत परिणाम होत होता. पंचायत समितीचा कारभार हाती घेतल्यानंतर सभापती शर्वरी वेल्ये यांनी प्रशासनात पारदर्शकता आणण्यावर भर दिला. वादग्रस्त ठरलेल्या या कामगिरी बदल्यांचा त्यांनी प्राधान्याने फेरविचार केला. नियमांवर बोट ठेवत त्यांनी अन्यायकारक ठरलेल्या ३२ बदल्या रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून विनाकारण मनस्ताप सहन करणार्‍या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला असून, संपूर्ण तालुक्यातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

टाईम्स स्पेशल

प्रशासकीय पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित हीच आमची प्राथमिकता आहे. नियमाला धरून नसलेल्या ३२ कामगिरी बदल्या रद्द करून शिक्षकांना मूळ शाळेवर पाठवण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तालुक्यातील शून्य शिक्षकी शाळांचा प्रश्न अत्यंत गंभीर असून त्याबाबत स्वतंत्रपणे विचार केला जाईल. पुढील टप्प्यात या शाळांवर शिक्षकांच्या नियुक्तीचा योग्य निर्णय घेतला जाईल. दरम्यान, रद्द केलेल्या ३२ बदल्यांनंतर आता शिल्लक राहिलेल्या १४ केंद्रीय बदल्या आणि शून्य शिक्षकी शाळांचा तिढा प्रशासन कसा सोडवते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. मात्र, सभापती शर्वरी वेल्ये यांनी पहिल्याच धडाक्यात घेतलेल्या या निर्णयामुळे शिक्षण वर्तुळात आणि राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg