loader
Breaking News
Breaking News
Foto

लोटे येथे महामार्गावरील मोकाट गुराला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू; खेडच्या नईम बशीर चौगुले यांचा दुर्दैवी अंत

खेड (प्रतिनिधी) : पत्नीला भेटण्यासाठी चिपळूणच्या दिशेने मोटारसायकलवरून जात असताना लोटे येथे महामार्गावर फिरणार्‍या मोकाट गुराला दुचाकीची जोरदार धडक बसून खेड येथील नईम बशीर चौगुले यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. बुधवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास लोटे येथील जुन्या महामार्ग पोलीस चौकीजवळ हा भीषण अपघात घडला. धडक इतकी जोरदार होती की, अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून धडक बसलेले जनावरही जागीच मृत झाले. हेल्मेट परिधान केलेले असतानाही नईम चौगुले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील नईम चौगुले यांना तातडीने चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेने खेडसह परिसरात शोककळा पसरली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

नईम बशीर चौगुले हे खेड भाजपाचे सक्रिय पदाधिकारी म्हणून कार्यरत होते. अ‍ॅड. वैभव खेडेकर यांचे विश्वासू साथीदार म्हणूनही त्यांची ओळख होती. पक्षाच्या विविध उपक्रमांसह सामाजिक कार्यात ते नेहमीच सक्रिय सहभाग घेत असत. कोणत्याही सामाजिक कामासाठी पुढाकार घेण्याची त्यांची वृत्ती आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता. खेड बसस्थानक परिसरात त्यांनी स्वतःचे मोबाईल शोरूम उभे केले होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वतःच्या कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर व्यवसाय उभा करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. मेहनत, चिकाटी आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द यामुळे अल्पावधीतच त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. व्यवसायासोबतच सामाजिक क्षेत्रातही योगदान देण्याची त्यांची धडपड सुरू होती. बुधवारी रात्री पत्नीला भेटण्यासाठी चिपळूणकडे जात असताना लोटे येथे महामार्गावर अचानक फिरणार्‍या गुरांमुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. रात्रीच्या वेळी महामार्गावर गुरे फिरत असल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

टाईम्स स्पेशल

या अपघातामुळे महामार्गावरील भटक्या जनावरांचा प्रश्न किती गंभीर आहे, याचीही जाणीव झाली असून त्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. या अपघाताची बातमी खेड शहरात पोहोचताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. नईम चौगुले यांच्या निधनाची माहिती समजताच भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच त्यांचे मित्रपरिवार आणि परिचितांनी चिपळूण येथील रुग्णालयाकडे धाव घेतली. होतकरू, मेहनती आणि सामाजिक जाण असलेल्या तरुणाचा अशा प्रकारे अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या निकटवर्तीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नईम चौगुले यांच्या पश्चात पत्नी, कुटुंबीय, नातेवाईक व मित्रपरिवार असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबाचा आधार हिरावला असून मित्रपरिवार आणि सामाजिक क्षेत्रातील सहकार्‍यांमधूनही शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या निधनाने खेडच्या सामाजिक व राजकीय वर्तुळातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. दरम्यान, महामार्गावर रात्रीच्या वेळी गुरे फिरत असल्याने भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg